फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर बंदी?

फेब्रुवारी महिन्यातील सर्वात उत्तम बातमी कोणती? या प्रश्नाचे उत्तर माझ्यासाठी एकच आहे ते म्हणजे ( Ministry of health and family welfare) आरोग्य विभागाने फेअरनेस क्रिमच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे़. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जवळपास सगळ्याच “news channels” वर हिच बातमी झळकत होती. “गोरा रंग ” मिळवून देणार्‍या जाहिराती बंद झाल्या नाही तर ५ वर्ष कारावास आणि ५० लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. या बातमीच्या मुळापर्यंत गेल्यानंतर समजते की हा प्रस्ताव फक्त गोऱ्या रंगापुरता मर्यादित नसून यामध्ये अन्य गोष्टींचाही समावेश करण्यात आला आहे. Drugs and Magic Remedies (objectionable advertisement) (amendment) Bill, 2020, नुसार उजळ रंग मिळवून देणार्‍या, उंची वाढवणार्‍या, कमी वय दाखवणाऱ्या आणि वेगवेगळ्या दुर्धर आजारांवर उपचार सुचविणारया सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

रंग या शब्दाचा विचार केला की आपणास आवडता रंग आठवतो. पण हाच रंग एखाद्या व्यक्तीशी जोडला की तो हवाहवासा वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला संबोधण्यासाठी त्या व्यक्तीचे नाव पुरेसे आहे. पण त्या व्यक्तींमधील व्यंग शोधून त्या व्यक्तीला टोपण नाव देण्यात लोकांना अधिक सुख मिळते. मुळातच व्यंगाने व्यक्तीची ओळख ठरवणे चुकीचे आहे. त्यातही व्यक्तीला चिडवण्यासाठी रंगाचा वापर करणे म्हणजे मुर्खपणाच आहे. व्यक्तीचा रंग हि नैसर्गिक बाब आहे, तो कोणीही स्वतःसाठी मागितलेला नाही. पण हे समजण्याइतकी बौद्धिक क्षमताच काही लोक हिरावून बसले आहेत. लोकांच्या मानसिकतेवर तो ज्या समाजामध्ये राहतो त्याचा परिणाम असतो. प्रश्न हा आहे या रंगभेदाची सुरूवात नेमकी कुठून झाली? कारण राम, कृष्णाचे वर्णन करताना सावळा शब्दाचा वापर करणे गरजेचे वाटले असावे.

असे म्हणतात कि टेलिव्हिजन हा समाजाचा आरसा आहे. समाजामध्ये जे दिसते ते टिव्ही वर झळकते. कधी कधी समाजप्रबोधनासाठी पण या माध्यमाचा वापर केला जातो. मग या माध्यमांनी गोरेपणा मिळवून देणाऱ्या जाहिराती इतक्या उचलून का धरल्या आहेत, या गोष्टींच्या अतिवापरामुळे? पण याचे कारणही आपणच आहोत ना? मुलींसाठी वापरलेल्या सुंदर शब्दामागचा छुपा अर्थ हा “गोरी” असाच असतो. हसु या गोष्टींचे येते की पूर्वी फक्त मुलीच या रंगभेदाने कंटाळल्या होत्या, पण फेअर अँड हँडसम ने मुलांच्याही सुंदरतेवर विनोद केला आहे. सततच्या उजळ रंगाच्या मारयामुळे व्यक्तीमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते. आणि फेअरनेस क्रिमची मागणी वाढते.

या विषयावर अनेक लोकांनी लिहिले आहे, सुशिक्षित म्हणवणाऱ्या पिढीने यावर चर्चाही केली असेल. पण चर्चेच्या त्या एका तासापलीकडचे शहाणपण कोणामध्ये आढळून येत नाही. या लेखामधुन काही साध्य करण्याचा माझा हेतू नाही. पण पुढच्या वेळेस समोरच्या व्यक्तीस “काळा” अशी टिप्पणी देताना या लेखाची आठवण नक्की होऊ द्या. जाहिरात बंदीमुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल का? त्या वस्तूचे उत्पादन बंद होईल का? ज्याप्रकारे music CD च्या नावाखाली दारूची जाहिरात केली जाते, तसे याही गोष्टींची जाहिरात सुरू होईल का? बंदी प्रस्तावामुळे असे अनेक प्रश्न मनासमोर उभे आहेत. पण मला सतावणारा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की…….

“समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ही बंदी पुरेशी आहे का? “

– श्वेता बारगोडे

Leave a comment